शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोविड प्रतिबंधक लस द्या, शिक्षक समितीची मागणी

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – सध्या दररोज रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षकांना प्रशासनाने वेगवेगळ्या कामात गुंतवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक शिक्षक जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य करीत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ४ एप्रिल नंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या प्राथमिक शिक्षक कुटुंब सर्वेक्षण, कोविड सेंटर येथे लसीकरण मोहीमेत सहभागी आहेत.

तहसील कार्यालयाद्वारे राबविण्यातलयेणाऱ्या मतदारांना घरोघरी जाऊन पंचनामा करणे, सारखी नावे वगळणे, मयत मतदान सर्वेक्षण यासाठी शिक्षक कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यासाठी शिक्षकांची कोविड चाचणी महत्त्वाची आहे. या कामांमुळे अनेक शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत.

शिक्षकांचा थेट संपर्क विद्यार्थी, पालक आणि कुटुंबांशी येत असल्याने शिक्षकांसह त्यांच्या सर्व कुटंबातील सदस्यांसाठी शासनाने लस उपलब्ध करून द्यावी, त्यांचे लसीकरण करुन घ्यावे.अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, सरचिटणीस हिवर्डेसह शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here