पुण्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीचं फटाके फोडून स्वागत

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या चार आरोपींची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर सदरील आरोपींचं शिवणेमध्ये फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं आणि लोकांना दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार दि. 24 रोजी शिवणेमधील राहुलनगर येथील बसथांब्यासमोर दुपारी दीड वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

सागर भालेराव वारकरी (वय 21), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय 20) आकाश सिब्बन गौंड (वय 19), सागर राजेंद्र गौड (वय 19) व सुरज राजेंद्र गौड (वय 24) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अभिषेक गुप्ता व त्याच्या इतर सहा ते सात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिकरी संतोष नांगरे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम नगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड आणि सागर गौड यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केल्यानंतर मंगळवारी ते तुरुंगातून बाहेर आले होते. तेव्हा संबंधित गुन्हेगारांच्या स्वागतासाठी त्यांचे साथीदार दुपारी दीड वाजता राहुलनगर येथील बसथांब्यावर जमले होते. त्यांनी हे चौघेही तेथे आल्यावर जोरजोराने घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांना देखील शिवीगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानतंर त्यांनी घटनास्थळी धाव घेत, पाच जणांना ताब्यात घेतले असून अभिषेक गुप्ता व इतर सहा ते सात आरोपी पसार झाले. पुढील तपास उत्तमगनर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here