मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – सध्या राज्यात कोरोनाचा महाविस्फोट झाला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य आणि पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचा कोरोना रिपोर्ट पॉसिटिव्ह आला आहे. काल सकाळी स्वॅब टेस्टसाठी दिल्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेला चिपळुणमधील अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हुसेन दलवाई यांना उपचारासाठी लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई यांच्यासोबत असलेले पदाधिकारी आजच्या महागाई निषेध मोर्चामध्येही सहभागी झाल्यामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. आतापर्यंत सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आता पुढील दोन आठवडे अधिक धोक्याचे असणार आहेत. या कालावधीत अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांपर्यंत पोहोचेल तर दिवसाला एक हजार मृत्यू होतील, असा धोक्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे.






