शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयांत रुपांतर करण्याची जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिंदखेडा (प्रतिनिधी) – शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे, तसेच शिंदखेडा येथील जनतेला रुग्णलयाशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचे धुळे जिल्हा (ग्रामीण) चे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, सार्वजनिक आरोग्‍य व कुटूंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे व पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली.

दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात शिंदखेडा येथे ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणुने थैमान घातले असून शिंदखेडा तालुकाही त्याला अपवाद नाही. शिंदखेडासह आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण आढळत आहेत. शिंदखेडा गांव व परिसराचा विचार केल्यास जवळपास दिड लाख लोकसंख्या हि शिंदखेडा ग्रामीण रुग्णलयावर अवलंबून आहे.

सध्याची कोविड परिस्थिती व शिंदखेडा ग्रामीण रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ यांचा विचार केल्यास शिंदखेड्यातील रुग्णांना दोंडाईचा, शिरपूर किंवा धुळे येथे जावे लागते. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे तीस खाटांची सुविधा असून अनेक समस्यांचे माहेरघर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय झालेले आहे. रुग्णालयांत पाण्याची समस्या, स्वच्छतेची समस्या, कर्मचाऱ्यांची समस्या, रुग्णवाहिका, पोस्ट मार्टम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची समस्या अशा एक ना अनेक समस्या भेडसावत आहेत.

अशा परिस्थितीत शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण असुनही ग्रामीण रुग्णालय आहे. ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल, शिंदखेड्यातील जनतेला अनेक चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील जनतेला आज ज्या समस्या भेडसावत आहेत त्याचे मोठ्या प्रमाणावर निराकरण होण्यास मदत होईल. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करणे गरजेचे आहे, असेही पत्रात शेवटी नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here