सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – लातूर-बार्शी राज्यमार्गावरील साखरा पाटीजवळ आयशर टेम्पो आणि छोटा हत्ती या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. गातेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गातेगाव पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एस.नवले यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.04 जीसी 2249 हा मुरुड येथून लातूरकडे येत होता. तर छोटा हत्ती क्रमांक एम.एच.12 जेएफ 5503 हा लातूर कडून मुरुडकडे जात होता. साखरा पाटीजवळ गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एस.नवले यांनी तातडीने पोलीस कर्मचारी पांडूरंग दाडगे, बाबुराव डापकर, जी.एल.गिरी यांना घटनास्थळी पाठवले. नागरीकांच्या मदतीने जखमींना लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामध्ये आयशर टेम्पोचा चालक धनराज बब्रुवान मोठे वय ४० रा. चिंचोली माळी ता.केज जि.बीड हा घटनास्थळीच मरण पावला होता. तर छोटा हत्तीचा चालक नितीन संपत कांबळे आणि त्याचा साथीदार अक्षय काशीनाथ कांबळे रा. बोरगाव काळे हे गंभीर जखमी होते.






