औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – औरंगाबाद -परभणी महामार्गावरील चारठाण्या जवळील चारचाकी कार व अॅपे अटोच्या अपघातात अॅपेतील चालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. अपघातनंतर कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल झाला नव्हता.
औरंगाबाद येथून नांदेडकडे भरधाव वेगात कार (एम.एच 30 ई. वाय.9948) जात होती. तर अॅपे ऑटो (क्रमांक एम.एच. 22 यु. 0552) हा मानकेश्वर (ता. जिंतूर) येथून देवगाव फाट्याकडे जात होता. दरम्यान दोन्ही वाहने चारठाण्या जवळील मानकेश्वर पाटीनजीक येताच एकमेकांवर जोरदार धडकली.
या अपघातात अॅपेऑटो चालक अविनाश गौतम ढाले (28, रा. मानकेश्वर ता.जिंतूर) हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती चारठाणा पोलिसांनी चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यास दाखल केले. वैद्यकीय अधिकारी माजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली औंषध निर्माण अधिकारी विजय ढाकणे यांनी प्रथम उपचार करून अधिक उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातात अॅपेचालकांचा एक पाय निकामी झाला असून अॅपेचा देखील चुराडा झाला आहे. कारमध्ये चालक व अन्य एक व्यक्ती प्रवास करीत होते. कारमधील एअर बॅगमुळे दोघांनाही दुखापत झाली नाही.






