निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

udhav-thakare

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.

या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले.

ते म्हणाले की, सध्या 3 लाख 57 हजार आयसोलेशन खाटापैकी 1 लाख 7 हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. 60 हजार 349 ऑक्सिजन खाटापैकी 12 हजार 701 खाटा , 19 हजार 930 खाटापैकी 8 हजार 342 खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. 9 हजार 30 व्हेंटीलेटर्सपैकी 1 हजार 81 वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडते आहे.

गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी 3 लाख सक्रीय रुग्ण होते आणि 31 हजार 351 मृत्यू झाले होते मात्र आता काल 27 मार्च रोजी 3 लाख 3 हजार 475 सक्रीय रुग्ण असून मृत्यूंची संख्या 54 हजार 73 झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी 24 हजार 619 रुग्ण आढळले होते. काल 27 मार्च रोजी एका दिवशी 35 हजार 726 रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या 24 तासांत 40 हजार झालेली असेल अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here