यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभिनव उपक्रम : झाड लावल्यावर मिळतील विद्यार्थ्यांना गुण

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ‘एक विद्यार्थी, एक झाड’ असा हा उपक्रम असून विद्यार्थ्यांना झाड लावल्याबद्दल तसेच त्याची देखभाल करून ते वाढवल्याबद्दल गुणही दिले जाणार आहेत.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या संकल्पनेतून यंदापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी झाड लावलेल्या वर्षी त्याला पाच गुण दिले जाणार आहेत. तसेच झाडाची देखभाल करून ते वाढवल्याबद्दल त्याला दुसर्‍या वर्षी पुन्हा पाच गुण मिळतील.

मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून जवळपास साडेपाच ते सहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील 50 टक्के विद्यार्थ्यांनी जरी या उपक्रमात सहभाग घेतला तरी जवळपास अडीच ते तीन लाख झाडे राज्यभरात लावली जाणार आहेत.त्यामुळे वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ग्रीन झोन तयार करण्यासाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमार्फत झाडांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.

उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी विद्यापीठाने अ‍ॅपदेखील विकसित केले आहे. या अ‍ॅपमध्ये पीआरएन नंबर टाकून विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. झाड लावल्यानंतर त्याचा फोटो या अ‍ॅपमध्ये अपलोड करावा लागणार असून त्याचवेळी अ‍ॅपमध्ये लोकेशनही सेव्ह होणार आहे. दर दोन महिन्यांनी विद्यार्थ्यांना झाडाचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. लोकेशन सेव्ह असल्याने इतर कोणत्याही झाडाचा फोटो विद्यार्थी अपलोड करू शकणार नाही. त्यामुळे झाडाबाबतची नोंद ठेवणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here