रावळपिंडीमध्ये १०० वर्ष जुन्या हिंदू मंदिराची तोडफोड

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या मंदिरावर हल्ले सुरूच आहेत. पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात १०० वर्षाहून अधिक जु्न्या हिंदू मंदिरावर अज्ञात व्यक्तिंनी हल्ला केला. पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. हा हल्ला शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास करण्यात आला.

या हल्ल्यात १० ते १५ जणांचा समावेश होता. हल्लेखोरांनी मुख्य दरवाजा आणि अन्य एका दरवाजासह जिनेदेखील तोडले. ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, इवॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) उत्तर झोनचे सुरक्षा अधिकारी सय्यद रझा अब्बास झैदी यांनी रावळपिंडीच्या बन्नी ठाण्यात या हल्ल्याची तक्रार नोंदवली आहे. मागील एक महिन्यापासून या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.

जैदी यांनी सांगितले की, मंदिरासमोर काही अतिक्रमण करण्यात आले होते. त्याला २४ मार्च रोजी हटवण्यात आले. मंदिरात धार्मिक कार्य, पूजा-उपासना सुरू झाली नव्हती. त्याशिवाय कोणत्याही देवाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मंदिरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मंदिराजवळ अतिक्रमण करणाऱ्यांनी दुकाने सुरू केली होती. बऱ्याच कालावधीपासून हे अनधिकृत बांधकाम करून जमिनीवर ताबा मिळवला होता.

जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मंदिराजवळील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवले होते. मंदिराला अतिक्रमण मुक्त केल्यानंतर नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. या दरम्यान, मंदिराचे प्रशासक ओम प्रकाश यांनी या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, मंदिरावर हल्ल्याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here