गडचिरोली – येथे पोलिस व नक्षलवादी चकमकीत ठार झालेल्या पाचही मृत माओवाद्यांची ओळख पटली असून चकमकीत 50 लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल माओवादी भास्करचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भास्करवर 41 खुनांसह पोलिसांवर हल्ल्याचे 78, जाळपोळीचे 16 इतर 19 असे 115 गुन्हे दाखल केले आहेत.

भास्कर हा 2019 च्या कुरखेडा भुसुरुंग स्फोटात 15 जवानाच्या हत्येचा कटात मुख्य भूमिकेत होता. भास्कर माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि माओवाद्याच्या दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य होता. भास्करचा मृत्यू माओवादी चळवळीसाठी मोठा हादरा आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये टिपागड दलमचा उपकमांडर सुखदेव नैतामचाही समावेश असून त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीस होते तर प्लाटून पंधराची सदस्य असलेल्या सुजाता गावडे हिचाही मृतांमध्ये समावेश असून तिच्यावरही पंधरा लाखांचे बक्षीस होते.






