मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – भारत विरुद्ध इंग्लडच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला. आयपीएल २०२१ च्या येणाऱ्या आगामी हंगामात तो खेळू शकणार नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली. श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदाच्या IPL 2021 मध्ये दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न कायम होता. मात्र अखेर अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन यांच्या नावांमधून ऋषभ पंतचं नाव अंतिम करण्यात आलं आहे
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आयपीएल २०२१ मध्ये भारताचा डावखुरा फलंदाज आणि विकेट कीपर ऋषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आली आहे. Delhi Capitals नं त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे.
कर्णधारपदाविषयी बोलताना ऋषभ पंत म्हणाला, “दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतूनच माझ्या IPL करिअरला सुरुवात झाली. या टीमचं नेतृत्व करणं हे स्वप्न मी आजपर्यंत पाहात आलो आहे. ते आज सत्यात उतरलं आहे. मला त्याचा खूप आनंद आहे. मी संघव्यवस्थापनाचा आभारी आहे की त्यांनी कर्णधारपद सांभाळण्यासाठी मला योग्य मानलं आणि मला ही संधी दिली. उत्तम कोचिंग स्टाफ आणि दिग्गज वरीष्ठ खेळाडू सोबत असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे”, असं ऋषभ म्हणाला.






