शरद पवार यांच्यावर 8 ते 10 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया होणार – राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीची देखभाल करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी दिली. तसेच येत्या आठ ते दहा दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बुधवारी दुपारच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. शरद पवार यांच्यावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळल्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. तसेच त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. येत्या 8 ते 10 दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अॅडमिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here