पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारनं आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलीय. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.

‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलीय. कोविड १९ संक्रमणादरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली जात असल्याचं म्हटलं गेलंय. ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, कोणत्याही दंडाशिवाय आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना लिंक करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं नागरिकांची सरकारी अधिकृत वेबसाईटवर एकच झुंबड उडाली होती. नागरिकांनी आज शेवटच्या दिवशी सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्र आणि इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी पॅनकार्ड आधार जोडणीसाठी गर्दी केलेली दिसली. एकाच वेळी अनेक युझर्सनं लॉग इन केल्यानं आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे वेबसाईटवर आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. परंतु, उद्या याच कामासाठी १००० रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार असं वाटत असताना आयकर विभागाकडून पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा मिळालाय.

या अगोदरही केंद्राकडून आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली गेली होती. गेल्या मंगळवारी २३ मार्च २०२१ रोजी लोकसभेत ‘वित्त विधेयक २०२१’ संमत करण्यात आलं. यामध्ये ‘आयकर कायदा १९६१’ मध्ये नव्या कलम २३४ एच नुसार याविषयीची तरतूद करण्यात आलीय. यानुसार, पॅन क्रमांक आधारला लिंक नसेल तर व्यक्तीला १००० रुपयांपर्यंतच दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय त्या व्यक्तीला पॅन क्रमांक अवैध घोषित झाल्यामुळे इतर अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here