नवी दिल्ली – देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते.
सध्या रोज दिलेल्या डोसची सरासरी २१ लाख आहे. ही संख्या ५० लाखांवर जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात ५० हजार केंद्रांवर एक दिवसात १०० ते २०० डोस देण्याची व्यवस्था आहे. हे लसीकरण वेगाने व्हावे म्हणून खासगी रुग्णालयांना सहभागी करून घ्या, असे राज्यांना सूचित करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये ४०% हून अधिक डोस खासगी रुग्णालयांत दिले जात आहेत.
दरम्यान, फायझरने म्हटले आहे की, त्यांची कोविड-१९ लस १२ वर्षांवरील मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी आहे. आतापर्यंत सर्व लसी १६ वर्षांवरील लोकांसाठी देण्यात येत आहेत. मॉडर्नानेही १२-१७ वर्षांच्या मुलांवर लसीच्या परिणामांचे प्रयोग सुरू केले आहेत.
जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये ८ डिसेंबर २०२० रोजी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत तेथे रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ९४% कमी झाली. लसीकरणानंतर रुग्णसंख्या घटत असल्याचे जगातील हे सर्वोत्तम उदाहरण आहे. भारतात आतापर्यंत फक्त ३.८% लोकांना डोस दिले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनुसार देशातील २० टक्के लोकसंख्येला लस दिली गेल्यानंतरच भारतात रुग्णांच्या संख्येत घट सुरू होणे शक्य आहे.






