बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडमध्येही कोरोनाचा प्रसार जोमाने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, संजय लिला भन्साळी यांच्यानंतर आता ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बप्पी लहरी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त समोर येताच त्यांचे चाहते लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. यानंतर बप्पी लहरी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सर्वांना विनंती केली आहे, की बप्पी यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं एकदा आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी. बप्पी लहरी यांची मुलगी रेमा लहरी बंसल हिनं सांगितलं की बप्पी दा यांनी सतत कोरोना नियमांचं पालन केलं आणि तेवढीच काळजीही घेतली मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली.

कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यानंतर त्यांची तपासणी केली असता रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांचं वय लक्षात घेता संपूर्ण कुटुंबानं त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेमा लहरी यांनी सांगितलं, की लवकरच ते घरी पुन्हा येतील. यासोबतच बप्पी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्याचे रेमानं आभारही मानले.

17 मार्चला बप्पी लहरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी कोरोनाच्या लसीसाठी नोंदणी केल्याचं सांगितलं होतं. सोबतच 60 वर्षावरील सर्वांना तसंच 45-59 वयोगटातील नागरिकांनाही लस घेण्याचं आवाहन केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here