प्रसिद्ध हॉटेलच्या किचनमध्ये झुरळ आढळल्याने परवाना सात दिवसांसाठी निलंबित

अहमदनगर (प्रतिनिधी) – किचनमध्ये झुरळांचा वावर, काही मशिनरीमध्येही झुरळ मरून पडलेली, किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, मुदतबाह्य कच्चे अन्नपदार्थ, संधी देऊनही सुधारणा केली नाही, अशा अवस्थेत नगर शहरातील प्रसिद्ध हॉटेल ‘औरस’चा (हॉटेल कपिराज) परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. त्यानुसार 26 एप्रिल ते 2 मे 2021 या काळात संबंधितांना हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यात हॉटेलची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. 30 डिसेंबर रोजी नगर शहरातील मनमाड रोडवरील हॉटेल ‘औरस’ची (हॉटेल कपिराज) तपासणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. पी. शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तपासणी केली होती. या हॉटेलमध्ये तपासणीवेळी अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. प्रामुख्याने किचनमध्ये झुरळांचा वावर मोठय़ा प्रमाणात आढळला. काही मशिनरीमध्ये झुरळ मरून पडल्याचे आढळले. किचनमध्ये मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आढळली. कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झाल्याचे आढळले. बारमध्ये ‘मॉकटेल’ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश मुदतबाह्य झाल्याचे आढळले. हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे ब्रेड व इतर बेकरी पदार्थ यांच्यावर कोणत्याही प्रकारचे लेबलवर्णन नव्हते.

हॉटेलमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल न करणे, गोदामामधील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त ठेवणे, मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा, किचनमधील फ्रिज व डीप फ्रिजरमध्ये अन्नपदार्थ अस्ताव्यस्तपणे साठविणे, साठविलेल्या तयार अन्नपदार्थांवर कोणत्याही प्रकारचे लेबल नसणे, कामगारांची अस्वच्छता असे अनेक दोष आढळून आले. त्यामुळे व्यवस्थापनाला 6 जानेवारी 2021 रोजी सुधारण्याची नोटीस देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here