मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर धावती बीएमडब्ल्यू पेटली

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवारी दुपारी ‘द बर्निंग कार’ चा थरार अनुभवायला मिळाला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पनवेल हद्दीत अचानक आग लागली. या आगीत कार जळून पूर्ण राख झाली. मात्र कारमधील चालकासह तिघेही बचावले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन जण मुंबईहून पुण्याकडे एका बीएमडब्यू कारमधून जात होते. त्यावेळी एक्स्प्रेसवेवरील किलोमीटर सहा जवळ असताना कारमधून धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर चालकानं तत्काळ प्रसंगावधान राखत सर्विस लेनवर कार थांबवली आणि नेमकं काय झालं याची तपासणी चालक करू लागला. त्यावेळी वाहनांमधील वायरिंग जळत असल्याचं चालकाच्या निदर्शनात आलं. पण त्यानंतर काही क्षणांत आग वाढली आणि आगीनं एवढं रौद्र रूप धारण केलं की, त्यात कार पूर्णपणे जळून राख झाली.


आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणा मदतीसाठी धावून आली. त्यानंतर आग विझवण्यात आली. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता त्यामुळं आगीत कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.

दरम्यान सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीच्या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याकडे जाणारी वाहतूक महामार्ग पोलिसांनी काही वेळासाठी थांबवली होती. त्यामुळं काही वेळासाठी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर काही वेळाने ही वाहतूक सुरळीत झाली.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here