मुंबई (संदेश काटकर) – कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असतानाच लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. भारताच्या लोकसंख्येच्या मानाने लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे सरकारसमोर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सध्या टप्प्याटप्यात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरु केली गेली. नंतर ४० वर्षावरील नागरिकासाठी राबवली गेली. त्यानंतर ४५ वर्षावरील जनतेसाठी लसीकरण मोहीम सध्या राबवली जात आहे. परंतु कोरोनाचा वाढता धोका पाहता ७५ वर्षे व त्याहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लास द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या ज्येष्ठ नागरिकांना अनेक व्याधी तसेच आजार असतात, त्यांना चालण्याची समस्या असते. त्यामुळे त्यांचे लसीकरण घरी जाऊन करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच इतर ओळखपत्र त्यांच्याकडे मागितले जाऊ नये. दोन वकिलांनी ही याचिका केली आहे. राज्य सरकार तसेच मुंबई महानगरपालिकेला तसे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.






