नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई शहरात कोविड रुग्णाची संख्या मार्च २०२० सालच्या तुलनेत २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. वाढीव कोविड बाधितांची संख्या पाहता शहर पुन्हा संकटात सापडले आहे. असे निदर्शनास येत आहे. या अचानक वाढलेल्या रुग्णाच्या संख्येपुढे कोविड सेंटर अपुरी पडत आहेत.नवी मुंबईत नियुक्ती झाल्यानंतर आपण बऱ्यापैकी नियत्रंण मिळवले होते. त्यामुळे पालिकेने २३ पैकी १८ कोविड सेंटर्स तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
सिडको कोविड सेंटर सुरू ठेवले आहे. मात्र सध्या हे सेंटर कोविड बाधीत रुग्णांनी पूर्ण भरले असल्याने उपचार घेण्यासाठी येणाऱ्या पेशंटना थांबावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.सध्या कडक उन्हाळा सुरू असून वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. भविष्यात पावसाळ्यात आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे सध्याच्या उपलब्ध सेंटरपेक्षा अतिरिक्त सेंटर्सची गरज लागू शकते. भविष्यात पालिकेने वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करत सानपाड्यातील एमटीएनएल इमारतीतील पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी शिवसेनेचे शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर याना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेनेचे शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे यांनी पत्रातून पालिका आयुक्तांना सांगितले की, सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयातील कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे. तसेच सानपाडा सेक्टर १० येथील एमटीएनएल ची इमारत रिकामी असून, या ठिकाणी पालिकेला १०० पेक्षा जास्त बेडचे नवीन कोविड केंद्र सुरू करता येऊ शकते. तरी या ठिकाणी नवीन कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे यांनी पालिका आयुक्त अभिजित बागंर यांना पत्राद्वारे केली आहे .






