मालेगाव (प्रतिनिधी आकाश सावंत) – येथील उपवनविभाग व विशेष पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईत दरेगाव शिवारात छापा टाकून तीन आरोपींसह दोन हरणांचे सुमारे 20 ते 25 किलो मांस, एक मोटारसायकल व वजनकाटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना गुप्त माहिती मिळाली की, मालेगाव शहराजवळील दरेगाव भागात काही इसम हरणांचे मांस विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे खांडवी यांनी आपल्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे यांना वनविभागाशी संपर्क करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रमाणे मालेगावचे उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे व पोलीस उपनिरीक्षक घुगे यांच्या संयुक्त पथकाने दरेगाव शिवारातील गट नंबर 68 मधील निळ्या व पांढर्या रंगाचे पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता तेथे आरोपी मुदस्सीर अहमद अकील अहमद (37, रा. चुनाभट्टी बेलबाग), शेख शब्बीर शेख रजाक (41, रा. गल्ली नंबर 3 कमालपुरा), सय्यद मुबीन सय्यद हारून (43, रा. सर्वे नं. 15 कमालपुरा) हे चिंकारा जातीच्या हरणांची शिकार करून आणलेल्या मांसाच्या तुकड्यासह आढळून आले.
आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48 अन्ववे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मांसाचे मोठ्या आकाराचे नऊ तुकडे, होंडा कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी, लाकडी ठोकळा असा सुमारे एक लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संयुक्त कारवाईत वनविभागाचे वनपाल आर.व्ही. देवरे, बी.एस. सूर्यवंशी, वनरक्षक एस.बी. शिर्के, आगार रक्षक आर.के. बागुल, रफिक पठाण, टी.जी. देसाई, विशेष पोलीस पथकातील पो.हवा. वसंत महाले, विकास शिरोळे, पोलीस सेवक संदीप राठोड, भूषण खैरनार, पंकज भोये आदी सहभागी झाले होते. अधिक तपास उपविभागीय वन अधिकारी येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे करत आहेत






