मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. परीक्षा घ्याव्या तर कोरोनाची नियमावली आणि न घ्याव्या तर मुलांचे नुकसान यामुळे काही काळ परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी विद्यार्थी तसेच पालकांतून होत आहे. म्हणून या मागणीवर विचार करुन राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
’11 एप्रिल रोजी होणारी स्पर्धा परीक्षा रद्द करावी आणि ज्यावेळेस राज्यातील रुग्ण संख्या नियंत्रणात येईल त्यावेळेस परीक्षा घ्यावी. सदर कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी देखील सरकारने खबरदारी घ्यावी,’ अशी मागणी वडेट्टीवार यांनीदेखील मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षाही या महिन्यात सुरू होत आहेत. ही परीक्षा रद्द करून नवी तारीख द्यावी, अशी मागणी आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा रद्द करून नव्याने नियोजन करावं, अशी मागणी केली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागण्यांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय काय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.






