बारामती – बारामती तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहीम आज लसीअभावी बंद पडली आहे. तर इंदापूर तालुक्यात कोरोना लसीअभावी लसीकरण बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रसाठी कोरोना लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक पाहता केंद्राकडून सर्वाधिक लसींचा पुरवठा राज्याला होणे गरजेचे होते. अशी राज्य सरकारकडून मागणी केली जात आहे. लशीच्या तुटवड्यावरून केंद्र-राज्य सरकारमधील संघर्षाचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र लसीकरण केंद्र बंद होण्यास सुरुवात झाली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. लसीकरणासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना माघारी फिरावे लागले.
बारामतीमध्ये आतापर्यंत ५३ हजार नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन अस्वस्थ झाले आहे. बारामतीमध्ये कोरोना संक्रमित दैनंदिन रुग्ण संख्या ३०० च्या घरात पोहचली आहे. अशा परिस्थितीत कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम महत्वाची मानली जाते.






