लॉकडाऊनच्या तयारीला लागा! वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन लावावाच लागेल हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला. राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लाण्टची उभारणी, बेडस् व अन्य वैद्यकीय सुविधा वाढवा.

रुग्णांसाठी रेमडेसिवीर उपलब्ध करा, त्याचप्रमाणे लसीकरणाचा वेग वाढवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले. लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी कोरोनावरील उपचारांसंदर्भातील उपाययोजनांबाबत टास्क फोर्सच्या सदस्यांशी विस्तृत चर्चा केली. आता आपण लसीकरणात पुढे आहोत, मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त लोकांना लस देऊ. हे लसीकरण आगामी काळात येणाऱया तिसऱया लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम पुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठया प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्यासाठी कार्यवाही करावी. रेमडीसीव्हीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क पर्ह्सने व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ टोपे यांनीदेखील रेमडीसीव्हीरचा पुरवठा किरकोळ विव्रेत्यांकडून न होता ते ठोक विव्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडीसीव्हीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.

सध्या 20 हजार 250 आयसीयू बेड्सपैकी 75 टक्के भरले असून 67 हजार ऑक्सिजन बेड्सपैकी 40 टक्के भरले आहेत. जवळपास 11 ते 12 जिह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या 1200 मेट्रिक टनपैकी 980 मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही ते म्हणाले.

कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत. वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा. मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्दय़ांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संसर्ग पसरवीत आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसताना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धती (एसओपी ) तयार करण्यात येईल.

राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर माध्यमांना दिली. लॉकडाऊन लावण्यासंदर्भात राज्याच्या टास्क पर्ह्सने तयारी दर्शवली आहे. रुग्णसंख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र लॉकडाऊन लावण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व विभागांशी चर्चा करतील. अर्थ विभाग आणि इतर विभागांशी चर्चा करतील. राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतील. त्यानंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेतील, असेही राजेश टोपे म्हणाले.

95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात. केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी. सोसायटय़ांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी. डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला 6 मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत. तरुण रुग्णांनादेखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे. त्याचे नियोजन करावे. मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे, एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग करून घेणे आदी सूचना टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टर्सकडून करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here