कोरोनामुळे भाजपच्या माजी आमदार पास्कल धनारे यांचे निधन

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पास्कल धनारे हे 2014 साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. डहाणुतून निवडून येणारे ते भाजपचे प्रथम आमदार होते.

काही दिवसांपूर्वी पास्कल धनारे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धनारे यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. त्यामुळे पास्कल धनारे यांना वापी येथील रेनबो रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली आहे.
कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डहाणू विधानसभा मतदारसंघात पास्कल धनारे यांनी पहिल्यांदा भाजपला विजय मिळवून दिला होता. मात्र, नंतरच्या काळात पास्कल धनारे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क कमी झाला होता. त्यामुळे पास्कल धनारे यांनी पक्षाची नाराजीही ओढावून घेतली होती. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारीही दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक राजकीय नेते, समाजसेवक, सेलिब्रेटींना कोरोनाची लागण होत आहेत. महाराष्ट्रातील काही नेत्यांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here