नवी दिल्ली – देशभरात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाअधिक लसीकरण करणे गरजेचे आहे. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात लसीकरणात सहभाग नोंदवावा यासाठी सरकार पातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू असताना आता बँकांनीदेखील त्यात हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. देशात लसीकरण वाढविण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नवी योजना सुरू केली असून त्यानुसार लस घेतलेल्या नागरिकांना बचत ठेवीत अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘इम्युन इंडिया डिपॉझिट योजना’ असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
देशभरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. या वाढत्या कोरोनाला लगाम लावण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्याची गरज असून यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृतीदेखील करण्यात येत आहेत. त्याच दृष्टिकोनातून आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही नवी योजना जाहीर केली असून यात लस घेतलेल्या व्यक्तींसाठी बचत ठेवीकरिता 0.25 टक्के अधिकचा व्याजदर लावण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेंअर्तगत सध्या सुरू असलेल्या व्याजदरपेक्षा 0.50 टक्के अधिकचा व्याजदराचा लाभ मिळणार आहे.
बँकेने यासंदर्भातील केलेल्या घोषणेनुसार ‘इम्युन इंडिया डिपॉझिट’ असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. एकूण 1 हजार 111 दिवसांसाठी ही बचत ठेव ठेवता येणार आहे. फक्त लसीकरण केलेल्या नागरिकांसाठीच ही बचत ठेव ठेवता येणार आहे. सध्या देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत अधिकाअधिक नागरिकांनी सहभाग घेण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आल्याचे बँकेने जाहीर केले आहे.






