वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – येथील विमानतळावरील पोलीस अधिकारी प्रदीप काळे यांनी वारणा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, असा आत्महत्येचा कोणताही प्रयत्न काळे यांच्याकडून झाला नाही. अशी घटना घडली नाही, असा खुलासा पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे यांनी केला आहे.

प्रदीप काळे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअॅपवर मजकूर पोस्ट केला. वरिष्ठांकडून होणारा छळ सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर वारणा नदीत उडी घेतली. काळे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कोल्हापूर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून काम करत होते. तीन महिन्यांपूर्वी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. उजळाईवाडी विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासून ते मानसिक तणावात होते. आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज सकाळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर टाकला. अधिकार्‍यांनी तो मेसेज पाहताच त्यांची भंबेरी उडाली. तातडीने सर्वांनी त्यांचा शोध सुरू केला. पण, त्यांनी मोबाइल स्वीच ऑफ केल्याने शोध घेण्यात अडचण येऊ लागली.

पोलिसांनी काळे यांच्या मोबाइल लोकेशनची माहिती घेतल्यानंतर, ते वारणा नदीच्या काठावर असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी वारणा नदीत उडी मारल्यानंतर तेथे असलेल्या काहींनी त्यांना वाचवले. मात्र, ते बेशुद्धावस्थेत होते. पोलिसांनी त्यांना प्रथम कसबा बावडा येथील सेवा दवाखान्यात दाखल केले. नंतर एका खासगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. त्यांनी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्‍याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेने पोलीस दल हादरले आहे. काळे अजूनही बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांचा जबाब घेता आला नाही. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे काळे यांनी व्हाट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

काळे पेठवडगाव पोलीस ठाण्यात असताना अडीच वर्षात त्यांनी पेठवडगाव शहर आणि परिसरात चांगली कामगिरी केली होती. करोना आणि लॉकडाऊनची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. त्यातच तेही करोनाबाधित झाले होते. त्यातून बरे होताच त्यांनी प्लाझ्मा दान केला होता. या त्यांच्या आदर्शवत कामाचे पोलीस खात्यासह सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. वडगाव पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर पदभार सोडताना परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांना निरोप दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here