जळगाव (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी, हिंदी, संस्कृत व संगीत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा दर वर्षी होत असते. महाराष्ट्रभरातून असंख्य तंत्रज्ञ, कलाकार या स्पर्धेत भाग घेत असतात. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ (प्राथमिक आणि अंतिम ) अजूनही झालेला नाही. त्यामुळे बक्षीस रक्कम, टीए, डीए (प्राथमिक, अंतिम ) हे खर्च सुद्धा मिळू शकलेले नाहीत. सध्या कोविडमुळे अनेक रंगकर्मींना आर्थिक अडचणीतून जावं लागतंय. कोणतीही तक्रार नं करता सर्व रंगकर्मी ३-४ महिने संयम राखून आहेत. मात्र आता फार काळ दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्रातील रंगकर्मींनी मा. मुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्याजवळ यापूर्वीच पत्रव्यवहार तसेच दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क केला आहे. मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. महाराष्ट्रातील संवेदनशील रंगकर्मींना हे माहिती आहे की, संपूर्ण महाराष्ट्रावर आलेलं हे संकट दुर्दैवी आहे. त्यात सर्व रंगकर्मीं महाराष्ट्र शासनासोबत आहेतच. मात्र आम्हा रंगकर्मींची बाजू सुद्धा शासनाने समजून घ्यावी व यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती सर्व रंगकर्मींनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.







