२३ जुलै बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांचा स्मृतिदिवस

योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)
महमूद अली हे बॉलिवूडमधील एक प्रसिध्द नाव. आपल्या अफलातून अभिनयाने, टायमिंगने एकेकाळी या हास्यअभिनेत्याने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे. मेहमूद यांची प्रसिध्दी इतकी होती की, चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना नायकापेक्षा अधिक मानधन मिळत असे. मात्र हा प्रवास एवढा सोपा नव्हता.
मेहमूद अली यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ ला बॉम्बे टॉकीजमध्ये काम करणाऱ्या मुमताज अली यांच्या घरात झाला. त्यांच्या आठ अपत्यांपैकी दुसरा मेहमूद अली. लहानपणापासून अभिनयाची आवड असली तरी घरची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी अंडी आणि कंगवे विकण्याचे काम केले. थोडे मोठे होताच टॅक्सी चालविण्यास शिकले. मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तिथे ते मीना कुमारीची बहीण मधू हिच्या प्रेमात पडले, मधुशी लग्न करण्याकरिता आत्महत्या करण्याची धमकीसुध्दा देऊन टाकली. अखेरीस मधु आणि मेहमूद यांचा विवाह झाला. पुन्हा अभिनयाच्या आवडीने उचल घेतली. मेहमूद यांनी अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला “दो बिघा ज़मीन” व “प्यासा” ” या चित्रपटात छोटी मोठी कामे केली. पहिला ब्रेक परवरिश या चित्रपटात मिळाला. ज्यात राज कपूर यांचा भावाची भूमिका केली. मग ते प्यार किए जा, प्यार ही प्यार, ससुराल, लव इन टोकियो व जिद्दी सारखे हिट चित्रपटात दिसले. यातील काही चित्रपटात हिरो म्हणून रोल केले, परंतु प्रेक्षकांनी त्यांना कॉमेडियन म्हणून पसंती दिली. नंतर मेहमूद यांनी त्यांचे स्वत:चे प्रॉडक्शन हाउस सुरु केले. प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट छोटे नवाब नंतर सस्पेंस-कॉमेडी फिल्म भूत बंगला व साठच्या दशकातील हिट चित्रपट पड़ोसन. पड़ोसनला अजून ही श्रेष्ठ विनोदी चित्रपट मानले जाते.
मेहमूद यांनी यानंतर अनेक चित्रपटात कामे केली. गुमनाम, प्यार किए जा, बॉम्बे टू गोवा, सबसे बड़ा रूपैया, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुँवारा बाप इ. सिनेमांत हीरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी महमूद हीरोपेक्षा काही पटीने जास्त पैसे घेत होते. ‘मै सु्ंदर हूं’ सिनेमात महमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हीरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना दोन लाख रुपये तर महमूद यांना आठ लाख रुपये मानधन मिळाले होते. असेच ‘हमजोली’ सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु महमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते. सिनेमाच्या पोस्टवर नायकाच्या बरोबरीने त्यांचेही छायाचित्र झळकत असे. हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे असलेले मेहमूद हे अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. मेहमूद आणखी एका गोष्टीसाठी प्रसिध्द होते ते म्हणजे ते कोणत्याही प्रसंगाची संवाद रिर्हसल करत नसत. जे काही असे ते उत्स्फूर्ततेने सादर करत असत.
मात्र त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना रडण्यासुध्दा भाग पाडले. ‘कुंवारा बाप’, ‘लाखो में एक जैसा’सारख्या सिनेमे याचे मोठे उदाहरण आहेत. या दोन्ही सिनेमामध्ये महमूद यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. ‘कुंवारा बाप’ ही महमूद यांच्या ख-या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. महमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाव्दारे मांडण्याचा प्रयत्न केला होता. आय.एस.जौहर व मेहमूद यांची जोडी खास मानली जाते. या दोघांनी जौहर महमूद इन गोवा व जौहर महमूद इन हाँगकाँग या चित्रपटात जान आणली.
मेहमूद यांनी अनेक कलाकारांना मदतीचा हात दिला होता. महानायक अमिताभ बच्चन यांना जेव्हा चित्रपट मिळत नव्हते तेव्हा मेहमूद यांचा भाऊ अन्वर अली यांच्यामुळे अमिताभची मेहमूदशी ओळख झाली आणि मेहमूद यांनी नायक म्हणून अमिताभला बॉम्बे टू गोवा या चित्रपटात घेतले. या चित्रपटाचा एक किस्सा सांगितला जातो. तो म्हणजे या चित्रपटातील गाणे ‘देखा ना हाय रे सोचा ना’ यात अमिताभला नाचायचे होते. अमिताभने जीव तोडून सांगितले की, मला नाचता येत नाही, पण मेहमूद यांनी काहीएक ऐकले नाही आणि अमिताभला या गाण्यात डान्स करावा लागला. या गाण्यातील त्यांचा डान्स प्रेक्षकांनाही आवडला होता. मेहमूद यांनी त्याच्या कारकिर्दीत ३०० पेक्षा हिंदी चित्रपटांमधून काम केले होते.
मेहमूद आणि मधू यांना आठ अपत्ये झाली, त्यातील १९९६ मध्ये त्यांची निर्मिती असलेला शेवटचा सिनेमा दुश्मन दुनिया का या चित्रपटातून त्यांनी आपला मुलगा मंजूर अली याला नायक म्हणून पडद्यावर आणले पण चित्रपट सपाटून आपटला. दुसरा मुलगा लकी अली हा प्रसिध्द गायक व अभिनेता आहे. जीवनात अनेक उतारचढाव पाहिलेल्या मेहमूद यांना अखेरच्या काळात हृदयविकाराने ग्रासले होते. यासाठीच्या उपचारांसाठी ते अमेरिकेला गेले होते. तिथेच उपचार सुरु असताना २३ जुलै २००४ ला पेनसिल्वेनिया येथे त्यांचे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here