जावली – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जावली तालुक्यात प्रत्येक गावागावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या राजकीय, धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बेलावडे येथेही ग्रामपंचायत व बौद्ध वस्ती मध्ये साध्या पद्धतीने भीम जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे , सरपंच वनिता रोकडे , नितीन दादा शिंदे , भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे , उपसरपंच अजय शिंदे , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक शेवाळे, पोलिस पाटील निशांत रोकडे व नरेंद्र रोकडे ,बळवंत बगाडे , विठ्ठलराव शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
रक्ताचा एकही थेंब न सांडता संपूर्ण भारतात सामाजिक , धार्मिक व राजकीय क्रांती घडवून आणणारे एकमेव महामानव , कोट्यवधी वंचितांचा उद्धार करणारे व गुलामांना राजा बनवण्याची ऊर्जा देणारे , भाकरी पेक्षा स्वाभिमानाला जास्त महत्व देण्याची शिकवण देणारे एकमेव महापुरुष म्हणजे डॉ बाबासाहेब , हजारों वर्षांपासून शोषित पीडित वंचित लोकांना गुरंढोरांच्यापेक्षाही हीन दर्जाची वागणूक देणारी मनुवादीजातीय समाज व्यवस्था एका तडाख्यात संपुष्टात आणून वंचितांना माणूस म्हणून जगण्याचे बळ देणारा मसिहा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर.
सामाजिक ऐक्य घडवून बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या तिन्ही मातृ संघटना वाढवण्याचा निर्धार खऱ्या अर्थाने समाज्याने केला पाहिजे हेच खरे अभिवादन बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने करूया असे आवाहन रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी केले . या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे , सरपंच वनिता रोकडे , नितीन शिंदे इत्यादी मान्यवरांनी भाषणातून अभिवादन केले ,प्रस्ताविक नरेंद्र रोकडे साहेब व आभार बळवंत बगाडे यांनी केले.






