नवी दिल्ली – दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जिवे मारण्याच्या धमकी दिली आहे. उत्तरप्रदेशच्या कोशांबी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार टिकैत यांना ज्या नंबरवरून फोन आला होता त्याचा तपास सूरू आहे. दरम्यान लवकरात लवकर टिकैत यांना फोनवरून धमकी देणाऱ्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी भारतीय किसान युनियन कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला आहे.
टिकैत यांच्या माहितीनुसार तो वारंवार फोन करत होता. दरम्यान टिकैत यांनी त्याला फोनवर समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. त्याला समजावून सांगूनही तो ऐकला नसल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे टिकैत यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी असाच टिकैत यांना धमकी देणारा फोन येत होता. तपासादरम्यान तो बिहारचा असल्याचे समोर आले होते.
दरम्यान २ एप्रिलला टिकैत यांच्या वाहनाच्या ताफ्यावर राजस्थानमध्ये मोठ्या समुहाने हल्ला चढवला होता. टिकैत हरसौरा येथील सभा झाल्यावर बानसूरला जात असताना वाटेत त्यांच्यावर हल्ला झाला होता. या दरम्यान त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यावर त्यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या होत्या यामध्ये टिकैत यांना कोणतीही जिवितहानी झालेली नव्हती. या दौऱ्यावेळी काही समाजकंटकांनी त्यांच्यावर शाईही फेकली होती. यानंतर शेतकरी युनियनने भाजपवर टीका केली होती.






