३० साधूंना कोरोनाची लागण; निरंजनी आखाड्याकडून कुंभ समाप्तीची घोषणा

हरिद्वार – देवभूमी उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आतापर्यंत कुंभमेळ्यातील ३० साधूंना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशहून कुंभमेळ्यासाठी हरिद्वार येथे आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना डेहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुंभमेळ्यातील ३० साधूंचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आखाड्यातील साधूंची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे, अशी माहिती हरिद्वारमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. झा यांनी दिली आहे. कुंभमेळ्यात १० एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान १७०० हून अधिक भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या दोन शाही स्नानावेळी सुमारे ४८ लाख भाविक सहभागी झाले होते. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री निरंजनी आखाड्याने कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत आहे. साधू संत आणि अन्य भाविकांना कोरोनाची लागण होत आहे. यामुळे कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली असल्याचे श्री निरंजनी आखाड्याचे प्रमुख आणि सचिव महंत रविंद्रपुरी यांनी सांगितले. भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असताना येथे थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. मास्कचाही वापर केला जात नसल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. सांधूसह भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने कुंभमेळ्यात कोरोना नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे.

कुंभमेळ्यात आलेल्या साधूचे कोरोनामुळे निधन
मध्यप्रदेशहून कुंभमेळ्यासाठी हरिद्वार येथे आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देव हे करोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले. हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले होते. ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण केवळ हरिद्वार कुंभ मेळ्यातून समोर आले आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here