चक्क टरबूजातून होतोय कोरोना रुग्णांना पानमसाला व दारुचा पुरवठा

यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची तलफ भागविण्यासाठी रुग्णांच्याच नातलगांनी टरबूज फोडून त्याच्या आत पानमसाला बार (खर्रा) पार्सल पाठविण्याचा प्रकार उघडकीस आला. तर काही नातलगांनी विदेशी मद्यसुद्धा पुरविण्याचा प्रयत्न काल गुरुवारी केला होता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि डॉक्टर यांच्या सतर्कमुळे हा प्रयत्न हाणून पाडला.

कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रुग्ण उपचार घेतल्यानंतर बऱ्यापैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हा अजब प्रकार शौकीनांची तलफ भागविण्यासाठी केला. मात्र, हा सर्व प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील या प्रकारामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 22 मृत्युसह 906 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 510 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सर्व 22 जणांचे मृत्यु हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले असून मृतांमध्ये यवतमाळ येथील 42, 72, 74 वर्षीय पुरुष व 60, 68, 68वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 74 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पुसद तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 63 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 37 व 46 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 60 वर्षीय महिला, कळंब येथील 54 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, वणी येथील 35, 55, 72 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 46 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 30 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या 906 जणांमध्ये 574 पुरुष आणि 332 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 315 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 126, पुसद 124, उमरखेड 80, पांढरकवडा 42, घाटंजी 30, मारेगाव 30, वणी 28, आणि 27, महागाव 25, दारव्हा 19, नेर 19, बाभुळगाव 12, कळंब 10, झरीजामणी 10, राळेगाव 4 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे. गुरुवारी एकूण 3900 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 906 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2994 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here