पीएचा जीव वाचवण्यासाठी गडकरींनी मध्यरात्री उघडायला लावलं बॅंकेचं लॉकर, 35 लाख केले खर्च

मुंबई (प्रतिनिधी) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. तसेच त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गडकरींच्या अशाच एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये नितीन गडकरींनी आपल्या स्वीय सहाय्यकाला एअर एम्बुलन्सने चेन्नईला नेण्याला किस्सा सांगितला.

नितीन गडकरी यांचे खासगी स्वीय्य सहाय्यक मंडलेकर यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना नागपुर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर नितीन गडकरी यांनी त्यांच्या डॉक्टरांची भेट घेतली. मात्र त्यावेळी आम्ही हरलो, काही करु शकत नाही असं डॉक्टर म्हणाल्याचं गडकरींनी सांगितलं. चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण ते आयसीयूमध्ये आणि ऑक्सिजनवर असल्याने त्यांना नेणं हे अवघड होतं, असं नितीन गडकरी म्हणाले.

नेण्याचं ठरलं मात्र अ‍ॅम्ब्युलन्सवाला 35 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स मागत होता. संध्याकाळ झाल्याने बँका बंद झाल्या होत्या. त्यावेळी मी पत्नी अध्यक्ष असलेल्या बँकेच्या सीईओंना फोन करुन बोलावलं आणि रात्री लॉकर उघडता येईल का?, असं विचारलं. मात्र हे 35 लाख रुपये दुसऱ्या दिवशी देण्याच्या अटीवर मागितल्याचं नितीन गडकरींनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. यानंतर त्याच्यावर यशस्वी उपचार झाले. बरा झाल्यानंतर तो भेटायला आला तेव्हा लहान मुलासारखा रडत होता. आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती मृत्यूला हात लावून परत आला आणि पुन्हा काम करु लागला याचा मला मनस्वी आनंद झाल्याचं गडकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here