एकाच वेळी 112 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; भोपाळमध्ये स्मशान शांतता

भोपाळ (मध्यप्रदेश) – कोरोना विषाणूच्या फैलावाने संपूर्ण देशाचीच चिंता वाढवली आहे. काही राज्यांत तेथील सरकारकडून जाहीर केली जाणारी कोरोनाबळींची आकडेवारी आणि स्मशानभूमीतील वास्तव यात भयंकर तफावत असल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी एकाच दिवशी भोपाळमध्ये कोरोनामुळे प्राण गमावलेल्या 112 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. भदभदा स्मशानभूमीत तर लागोपाठ 72 चिता पेटल्या.

देशभर कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांत प्रचंड वेगाने वाढला आहे. त्यात आता मृत्यूदरही भलताच वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. भोपाळच्या स्मशानभूमींतील गुरुवारच्या आगडोंबने कोरोनाचे गहिरे संकट ठळकपणे अधोरेखित केले. सरकारने दिवसभरात चौघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

प्रत्यक्षात वेगवेगळ्या स्मशानभूमींमध्ये 112 कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार केले गेले. यात भदभदा स्मशानभूमीत 72 आणि सुभाषनगरमध्ये 30 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच झदा कब्रस्तानमध्ये 10 मृतदेहांचा दफनविधी पार पडला. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या पाच दिवसांत भोपाळमध्ये केवळ 21 कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार केले गेले. प्रत्यक्षात या पाच दिवसांत स्मशानभूमींमध्ये 356 कोरोनाबळींवर अंत्यसंस्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here