कोलकाता : देशातील वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज (शनिवारी) पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान याअगोदर पार पडलंय तर अजून १५९ जागांवर मतदान बाकी आहे.
मतदानाच्या चौथ्या टप्प्यात सितलकुची भागात झालेल्या गोळीबारानंतर निवडणूक आयोगानं पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली आहे. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसेचा प्रकार घडल्याचं दिसून येतंय.
Urging all those voting in today’s fifth phase of the West Bengal elections to vote in large numbers. First time voters in particular should exercise their franchise.
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2021
बंगालमध्ये मतदान सुरू असताना भाजप नेते आज सकाळी १०.३० वाजता कोलकातामध्ये निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कूचबिहार टेपबद्दल तक्रार नोंदवणार आहेत. पश्चिम बंगामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पाच उमेदवार करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील तीन जण तृणमूल काँग्रेसचा, एक रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) तर एक जण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील नागरिकांना, खासकरून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येत आपल्या मताधिकाराचा वापर करण्याचं आवाहन केलंय.






