जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. परंतु शहरातील साधना हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी बाधिताचा मृतदेह प्लास्टीकच्या कव्हर पॅक न करता तो चक्क बेडशीटमध्ये गुंडाळून तो अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला.
जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील शेतकरी मार्तंंडराव रमेश देशमुख (वय 46) यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 11 एप्रिल रोजी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केटसमोरील साधना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना एचआरसीटीची टेस्ट करण्यास सांगितले त्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले. त्यांचा स्कोअर अधिक असल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले.
गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास देशमुख यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह नियमानुसार पॅकींग करुन देण्याबाबत मागणी केली असता, रुग्णालय प्रशासनाकडून ही सुविधा नसल्याचे सांगून पॅकींगची गरज नसल्याचे सांगून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करुन दिला.
मध्यरात्री 2 वाजता मार्तंडराव देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी वारंवार मागणी करुन देखील रुग्णालय प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात होता. यावेळी नातेवाईकांनी चार तास झाले तरी मृतदेह दिला नसल्याने नातेवाईकांनी विचारणा केली. यावर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह थेट रुग्णालयाच्या बेडशीटमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या स्वाधीन केले. नातेवाईकांना मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर त्यांनी तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी थेट नेरीनाका स्मशानभूमीत दाखल केला. यावेळी नातेवाईकांनी अंत्यंसंस्कारासाठी मृतदेह उघडला असता मृतदेहाच्या नाका तोंडातून रक्त वाहत असल्याचे त्यांना दिसून आले.
खासगी रुग्णालयाकडून मोठ्या प्रमाणात रुग्णांची लूट केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी शासनाने रुग्णालयांना दर निश्चित करुन दिले आहे. परंतु रुग्णालयांकडून तरी देखील अव्वाच्या सव्वा वसूल केले जात आहे. साधना हॉस्पिटलमध्ये दरपत्रक रुग्णालयाच्या बाहेर लावण्यात आले आहे. परंतू त्या दरपत्रकानुसार रुग्णांकडून आकारणीच केली जात नसल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे.
अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत ते तक्रार देखील करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर नेरीनाका स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु खासगी रुग्णालयांकडून तुम्ही मृतदेह कुठेही घेवून जा काही होत नाही, असे असा अजब सल्ला रुग्णालयांकडून नातेवाईकांना दिला आहे.






