अहमदाबाद (विशेष प्रतिनिधी) – कोरोनाविषयी अवघ्या जगभरात धास्ती पसरलेली आहे. कोणी कोरोनाला रोग समजतच नाही तर कोणी कोरोना म्हणजे मेडीकल क्षेत्राचे जागतिक षडयंत्र असल्याचा आरोप करत आहे. मात्र आपल्याला कोरोना झाला की काय? या भीतीने सर्वसामान्य जगत आहेत. कोरोनाविषयी असलेल्या अनेक समज गैरसमजांपैकी एक म्हणजे तोंडाची चव जाते. याच समजाचा वापर करुन येथील पाणीपुरी विक्रेत्याने एक शक्कल लढवली आहे.
कोरोना झालेल्या रुग्णाला चव कळत नाही असा एक समज दृढ असल्याने येथील राजू पकौडी सेंटर म्हणून असलेल्या या पाणीपुरी सेंटरवर आलेल्या गिऱ्हाईकाला अतितिखट पाणीपुरी फ्रीमध्ये खाऊन आपल्या कोरोनाची टेस्ट करुन तात्काळ रिपोर्ट मिळवा, अशी शक्कल लढवून आपला व्यवसाय वृध्दींगत केला आहे.
खरंच कोरोनामुळे चव समजत नाही याबाबत अनेक प्रवाद असले तरी आज कोरोनाविषयक असलेला हा एक समज मात्र या पाणीपुरीवाल्याच्या धंद्याच्या यशाचं गमक झाला आहे. त्याच्या या आगळ्या वेगळ्या शक्कलमुळे त्याचा व्यवसाय वाढला की नाही हा भाग वेगळा असला तरी त्याच्या पाणीपुरी सेटरविषयी चर्चा सोशल मिडीयावर जोरात सुरु झाली आहे.






