मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नगराळे यांनी दिला आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी कलर कोड सुरु करत आहोत, अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिलीये.
वैद्यकीय कर्मचारी यांच्या गाड्यांसाठी लाल रंग, भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत. मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. गाड्यांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे.






