पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात रविवारी दुपारी घडली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांच्या पुणे रेल्वे स्थानक ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
अनंत नायक (मूळ रा. भुवनेश्वर) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नायक हे लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयात ब्रिगेडिअर होते. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते मोटारीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर चालक होता. पुणे रेल्वे स्थानक परिसरात त्यांनी मोटारचालकाला थांबण्यास सांगितले. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस रेल्वेगाडीखाली नायक यांनी उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर नायक यांचा मुलगा अभिषेक याला या घटनेची माहिती देण्यात आली. नायक यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी करण्यात आली.






