मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे यातच बिहार राज्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बिहार सरकारचे माजी मंत्री मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले.
काही दिवसांपूर्वी जेडीयूतील तारापूरचे आमदार मेवालाल चौधरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सोमवारी पहाटे साडेचार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून ते ६५ वर्षांचे होते. मेवालाल चौधरी हे सलग दुसऱ्यांदा तारापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु विरोधकांच्या गदारोळामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
मेवालालाल चौधरी हे भागलपूर येथील सबौर कृषी विद्यापीठाचे कुलपती देखील होते. कुलगुरू असताना त्यांच्यावर नियुक्ती घोटाळ्याचा आरोप होता. दोन वर्षांपूर्वी त्यांची पत्नी आणि तारापूरच्या माजी आमदार नीता चौधरी यांचा मृत्यू झाला होता.






