शिर्डीत ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले : ताराचंद कोते

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रक्ताची कमतरता भासत असून त्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी शिर्डी येथील साई निर्माण करिअर अकॅडमी व वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी एकूण ८० रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती साई निर्माण करिअर अकॅडमीचे कार्यकारी संचालक ताराचंद कोते यांनी दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे. रविवारी सकाळी राहाता तालुका WMO च्या माध्यमातून साई निर्माण करिअर अकॅडमी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी साईनिर्माण करिअर अकॅडमीचे सर्व शिक्षक व साईनिर्माण ज्युनिअर आणि सिनिअर महाविद्यालयाचे शिक्षकवृंद तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. परिसरातील तसेच श्रीरामपूर, कोळपेवाडी, रामपूरवाडी, लोणी, बाभळेश्वर, कोपरगाव, नांदुर्खी, शिर्डी येथील अनेक सदस्यांनी त्याचबरोबर साईनिर्माण शैक्षणिक संस्थेच्या, अकॅडमीच्या व साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून मोठ्या आनंदाने रक्तदान केले.

सकाळी साईबाबांच्या व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करून रक्तदान शिबिरास सुरूवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत ४५ जणांनी रक्तदान केले तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ८० जणांनी रक्तदान केले. कोव्हिडमुळे बऱ्याच जणांना रक्तदान करता आले नाही. अशा लोकांनी फोनवर संपर्क साधून आपले मत व्यक्त केले. दरम्यान ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना कधीही रक्ताची गरज भासल्यास WMO च्या माध्यमातून त्यांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाईल, असे आवाहन मराठा ऑर्गनायझेशन यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित न सर्व रक्तदात्यांचे WMO व साई निर्माण ग्रुपच्यावतीने आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here