उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत चालला आहे. अशावेळी केंद्र सरकारने गेल्या 48 तासांत 5 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे, असा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. 22 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत उद्योगांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या किंमतीत दोन दिवसांपूर्वी कपात करण्यात आली होती. तसेच अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात लसीकरणाच्या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here