औद्योगिक क्षेत्र पुरस्कृत पहिल्या कोरोना लसीकरण केंद्राचे छगन भुजबळ यांच्या हस्‍ते ऑनलाईन उद्घाटन

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – कोरोनाच्या या लढाईत आता फक्त सरकारवर अवलंबून न राहता सर्वच क्षेत्रातील सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी पुढे आले पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारच्या ब्रेक द चेन या मोहिमेनुसार कोरोनाची साखळी तोडली पाहिजे. पण अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांचे लसीकरण देखील झाले पाहिजे. लसीकरणासाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहुन पुढे येत आहे ही गोष्ट भूषणावह आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक औद्योगिक वसाहतीमधील अंबड इंडस्ट्रियल व मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), एमआयडीसी व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभे राहिलेले महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील पहिले कोरोना लसीकरण केंद्र व आरटीपीसीआर टेस्टिंग सेंटरचे काल (सोमवारी) दुरदृष्य प्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले. त्या वेळी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, माजी चेअरमन धनंजय बेळे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. एस. गवळी, सरचिटणीस ललित बुब, आयपीपी राजेंद्र अहिरे पायोनियर हॉस्पिटलचे डॉ. चव्हाण आदी उपस्थित होते.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या या उद्धघाटनावेळी भुजबळ म्हणाले की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या आदेशात राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांनी लवकरात लवकर केंद्र सरकारच्या नियमानुसार लसीकरण केले पाहिजे, असे म्हटले आहे. कामगारांच्या ह्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहुन पुढे येत आहे ही गोष्ट भूषणावह आहे.

या कार्यक्रमावेळी चेअरमन धनंजय बेळे यांनी या लसीकरण आणि कोरोना चाचणीचा लाभ हा २५०० कारखान्यांचे कामगार व उद्योजकांना होणार आहे. यासाठी पायोनियर रुग्णालयाची देखील मदत मिळत असल्याची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे कोरोना रूग्णांसाठी कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याचा असोसिएशनचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. असोसिएशन घेत असलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक देखील केले. नुकतेच नाशिक येथे मेट भुजबळ नॅालेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद यांनी सूरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटर प्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी आता पुढे येत कोव्हिड सेंटर सुरू केले पाहिजे. औद्योगिक क्षेत्रातील मंडळींना हे सहज शक्य आहे. त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून सर्वांनी पुढे यावे असे आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here