ब्रिटनकडून भारताची ‘रेड लिस्ट’मध्ये नोंद; प्रवाशांवर लावले निर्बंध

नवी दिल्ली – भारतात धडकलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही वाढतच चालला आहे. दर दिवशी नव्या रुग्णांचा विक्रमी आकडा आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येत असल्यामुळं आरोग्य यंत्रणांपुढे असणारी आव्हानंही दिवसागणिक वाढत चालली आहेत. अशातच आता भारतातील कोरोनाचं संकट पाहता ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे.

सदर यादीत नोंद झाल्यामुळं आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. यासोबतच परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथं एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावं लागणार आहे.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये दिलेल्या माहितीनुसार तिथं भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचं नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता भारतीयांच्या ब्रिटन प्रवेशावर निर्बंध आले आहेत.

दरम्यान, सदर निर्णयाच्या काही तासांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पुढील आठवड्यातील नियोजित भारत दौराही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here