औरंगाबादला २४ वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – कुंभेफळ भागातील गट क्रमांक ३३८ च्या परिसरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाची आधी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली, त्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मारेकऱ्याने केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली. शेख आमीर शेख नजीर (२४, रा. नारेगाव) असे मृताचे नाव असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी काही संशयितांना करमाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभेफळ भागातील पेट्रोल पंपाजवळील एका शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा गळा चिरलेला होता. त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी त्याची माहिती विविध पोलीस ठाण्यांत आणि सोशल मीडियावर देण्यात आली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या मदतीने मारेकऱ्याचा माग काढण्यात आला.

मृत युवकाचे नाव शेख आमीर शेख नजीर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी अनोळखी मारेकऱ्यांविरोधात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here