बेड मिळण्याची वाट पाहणाऱ्या रुग्णाचा अखेर रुग्णवाहिकेतच मृत्यू

यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – दारव्हा येथून रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेल्या एका कोरोना संशयित रुग्णाला तब्बल दीड तास कुठल्याही डॉक्टरांनी अटेंड न केल्यामुळे त्याचा रुग्णवाहीकेतच मृत्यू झाला. ही घटना जिल्हा रुग्णालयात असलेल्या फीवर ओपीडीच्या बाहेर घडली. डॉक्टरांनी दीड तास उपचारासाठी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी यावेळी केला आहे.

जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यातही जिल्ह्यात कुठेही रुग्ण आढळून आल्यास त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येते. त्यामुळे बऱ्याचदा लक्षणे नसलेले आणि गंभीर नसलेले रुग्णही गरज नसतानाही ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात येतात. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रुग्ण मात्र बेडसाठी वेटिंगवर राहतात. सध्या जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत.

आता तर रुग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याने त्याचा फटका बसून रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यु होत आहे. दरम्यान, दारव्हा येथे राहणारे बबन गुल्हाणे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी अ‍ॅम्बुलन्सने यवतमाळ येथे आणले. या ठिकाणी प्रथम त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यावरुन गुल्हाने यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्या ठिकाणी बेड नसल्याने गुल्हाने तब्बल दीड तासापर्यंत बाहेर अ‍ॅम्बुलन्समध्येच ऑक्सिजनवर होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही बाब लक्षात येताच नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप केला. दीड तासापासून ते अ‍ॅम्बुलन्समध्ये असताना एकाही डॉक्टरने त्यांना साधे तपासलेही नाही, असा नातेवाइकांचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय परिसरात मात्र एकच खळबळ उडाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here