नाशिक (विशेष प्रतिनिधी) – येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीची गळती झाल्यामुळे २२ रुग्ण दगावले आहेत. पालकमंत्री छगन भूजबळ हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नाशिकमधील घटना दु:खद असल्याची प्रतिक्रिया यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी दिली. मर्यादेपेक्षा जास्त रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. एकूण १५७ रुग्णांपैकी १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते तर ६३ रुग्ण अतिगंभीर होते. ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या वारसांना २५ लाख रु. ची मदत जाहीर करण्यात आली आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून अचानक गळती सुरू झाली. त्यानंतर टाकीच्या गळतीच्या दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. शिवाय, अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली आहे.
टँकरमधून अचानक ऑक्सिजन गळती झाल्याने पाईपलाइनद्वारे रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले. परिणामी, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकला नाही, त्यामुळे आधीच अत्यवस्थ असलेल्या २२ रुग्णांना जीव गमवावा लागला, तसेच आणखी काही रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.






