अंबाजोगाईत ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यात ५ रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून हे मृत्यू ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने झाला असल्याचा आरोप आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयाने मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे. रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला हे खरे नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्टाता शिवाजी शुक्रे यांनी सांगितले आहे.

नातेवाईकांच्या या आरोपामुळे अंबोजोगाईत खळबळ उडाली आहे. नाशिकमधील घटना आजच घडल्याने अंबाजोगाईत जर ऑक्सिजनची कमतरता वाढत गेली, तर आमच्या रुग्णांचे कसे होणार याची चिंता अंबाजोगाईतील रुग्णांच्या नातेवाईकांना सतावू लागली आहे. जर ऑक्सिजनची कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने याबाबत आधीच खबरदारी का घेतली नाही, असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. या ५ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेला नसल्याचे ते म्हणाले. सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आज दिवसभरात स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एकूण ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाले असून आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय हे ६० वर्षांपर्यंत आहे. यामधील अधितकर रुग्णांना विविध शारीरिक आजार होते, अशी माहिती शुक्रे त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here