नवी दिल्ली – ‘‘राज्यसभेतील शपथविधीवेळी आपण घोषणा दिल्यानंतर सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यघटनेची आठवण करून दिली. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा कोठेही अपमान झालेला नाही. तसा झाला असता तर आपण तिथल्या तिथे राजीनामा दिला असता,’’ असा खुलासा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केला. दुसरीकडे खुद्द सभापती नायडू यांनी ट्विट करून आपण स्वतः छत्रपती शिवाजींचे प्रशंसक व भवानी मातेचे उपासक आहोत कोणाबद्दलही अनादर दाखविलेला नाही, असे स्पष्ट केले.
राज्यसभेत काल उदयनराजे यांनी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर नायडू यांनी वरिष्ठ सभागृहाच्या नियमांची आठवण करून देत तिथल्या तिथे इशारा दिला होता. सुरवातीला काँग्रेसच्या बाकांकडे पहातच त्यांनी ‘मी सभापती असून हे माझे सभागृह आहे. येथे सभागृहाच्या नियमांनुसारच काम चालेल’ असे म्हटले. मात्र उदयनराजे यांनी दिलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरुन महाराष्ट्रात नवे वादंग आणि पक्षीय राजकारण सुरू झाले. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वामार्फत उदयनराजे यांना ‘या वादावर लगेचच्या लगेच खुलासा करा,’ असा निर्देश दिला. त्यानंतर त्यांना तातडीने पत्रकार परिषद घ्यावी लागली.







