जालना येथे मृत रुग्णाच्या बँक खात्यातून पैसे गायब; बोटाचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने केली चोरी

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूची स्थिती हाताबाहेर जात आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतं आहे. रुग्णांचे कुटुंबीय आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार होतं आहेत, अशी एकंदरित स्थिती असताना जालना येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका वॉर्ड बॉयने मयत रुग्णाच्या बोटांच्या ठशांचा वापर करून त्यांच्या बँकेतील रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली आहे.

संबंधित घटना जालना कोविड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. येथील एका वॉर्ड बॉयनं एका मयत कोरोना रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरून ‘फोन पे’ वरून परस्पर पैसे लाटले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वार्डबॉयला ताब्यात घेतलं आहे. संबंधित वार्डबॉयनं यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

जालना शहरातील इंदिरानगर येथील कचरू पिंपराळे असं संबंधित मृत रुग्णाच नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी कचरू पिंपराळे यांच्या खात्यातून काही पैसे विड्रॉल झाल्याचं कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. बँक स्टेटमेंट आणि मोबाईल डिटेल चेक केलं असता कचरू पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरून फोनपेद्वारे 6800 रुपये ट्रान्सफर केल्याचं दिसून आलं आहे.

कचरू पिंपराळे यांचा मृत्यू तर पहाटे 6 च्या दरम्यान झाला होता, मग दुपारी दीड ते 2 च्या सुमारास पैसे कसे ट्रान्सफर झाले, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला. दरम्यान मृत पिंपराळे यांचा मोबाईल फोन रुग्णालयामध्येच असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. कोविड रुग्णालयातील वॉर्ड बॉय मोमीन मोसीन याने मयत कचरू पिंपराळे यांच्या अंगठ्याचा ठसा वापरून त्यांच्या खात्यातून फोनपेद्वारे 6800 रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर करून घेतल्याचे पुरावे कुटुंबीयांच्या हाती लागले. याशिवाय मृताजवळील 34 हजार रुपयांची रोख रक्कम आणि चांदीची अंगठीदेखील चोरी झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here